श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार : स्थापना ते आज पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन.
श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार : स्थापना ते आज पर्यंतच्या प्रवासाचे वर्णन.
चित्पावन ज्ञातीतील रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे, दिक्षित (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) व फक्त काश्यप गोत्री जोशी या उपनावांचा कुलस्वामी, श्री क्षेत्र आसूद येथील "श्री. देव व्याघ्रेश्वर" आहे. या तेरा उपनावांचे मूळ स्थान हे आसूद अथवा त्याच्या पंचक्रोशीतील एखाद्या गावात असणार असे वाटते. पुढे, नोकरी-धंद्याच्या निमित्ताने ही मंडळी मूळ गावांतून इतरत्र स्थलांतरीत झाली असावी. आपल्या कुलदैवताच्या दर्शनाच्या ओढीने ही मंडळी व नंतर त्यांचे वंशज "श्रीं" चे मंदिरात वारंवार येत असणार. पुढे नोकरी-व्यवसायातील व्यस्ततेमुळे व त्यानिमित्ताने होणाऱ्या निवासाच्या स्थलांतरामूळे, मूळ गावी येण्यात सातत्यात अंतर पडत गेले असावे...
काहीही असो पण आपल्या कुलदैवताची ज्योत मात्र अंतर्मनात ज्वलंत होतीच.. आणि म्हणूनच... सुमारे १९७० ते १९८० च्या दशकात, पुण्यातील श्री. पी. व्ही रानडे यांचे स्वप्नात वारंवार येऊन; श्री. व्याघ्रेश्वराने, त्याच्या कुलातील लोकांना एकत्र आणण्याचे संकेत दिले.... श्री. पी. व्हींना, या दहा वर्षांतील सतत पडणाऱ्या स्वप्नांचा नीटसा खुलासा होत नव्हता. त्यावेळी या उपनावातील बऱ्याच विद्यमान व्यक्तींना श्री. व्याघ्रेश्वर आपला कुलस्वामी आहे हे परंपरेने माहित असले तरी "तो" कुठे स्थित आहे हे नक्की माहित नव्हते. त्यांनी त्यांचे परिचयातील सर्वश्री. गोपाळ का. रानडे, श्री. ज. (बापूसाहेब) रानडे, बाबासाहेब रानडे, कर्नल रानडे या व अशा अनेक जणांच्या कानावर ही गोष्ट घातली व १९८० च्या सुमारास या मित्रमंडळींत वैचारिक चक्रं जोरात फिरु लागली. त्यानंतर वेळ न दवडता, श्री. पी. व्ही. रानडे, गोपाळ का. (गो. का.) रानडे, श्री. ज. (बापूसाहेब) रानडे, बाबासाहेब रानडे, कर्नल रानडे, मैनिनाथ रानडे, धनुकाका रानडे, ल. मु. रानडे, आत्मारामपंत धारप, बेळगांव-गोव्याचे गजाननराव जोशी या व अशा अनेक समविचारी व श्री. व्याघ्रेश्वराला वाहून घेतलेल्या मंडळींनी; सन १९८१ मध्ये श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराची स्थापना करुन, श्री व्याघ्रेश्वर कुलदैवत असणाऱ्या परंतू सर्वदूर पसरलेल्या मंडळींना एकत्र आणण्याचा चंग बांधला. भारतातील बांधकाम क्षेत्रातील एकेकाळच्या विख्यात "रानडे अँड पार्टनर्स" या कंपनीच्या संस्थापकांचे वंशज कै. धनुकाका व श्री. मैनिनाथ (मिनाकाका) रानडे यांनी थेट डेक्कन जिमखान्या सारख्या पुण्यातील मध्यवर्ती जागी न्यासाच्या कार्यालयासाठी जागा उपलब्द्ध करुन दिली.... आता पुढचे पाऊल म्हणजे, सर्वांनुमते, आसूद येथे, श्री. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्र उत्सव करण्याचे ठरले.
श्री. व्याघ्रेश्वराचा आशिर्वाद, नवनिर्मित परिवारातील सदस्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह व आसूदस्थित श्री. राजाभाऊ बिवलकर, श्री. दिगुअण्णा जोशी अशा मातब्बर लोकांची स्नेहपूर्ण साथ, त्यामूळे कार्य उत्तमप्रकारे सिद्धीस न जाते तरच नवल !! बहूत वर्षांचे खंडानंतर, इ. स. १९८२ रोजी श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातर्फे हा संपन्न झालेला पहिला "महाशिवरात्री-उत्सव". !! परिवारातील भक्तगणांच्या श्रद्धेची व निष्ठेची बिल्वपत्रे "श्रीं" वर भरभरुन वाहिली गेली आणि परत एकदा गाभाऱ्यातून येणारा ॐ कार ध्वनीची गुंज "त्या" च्या परिवारातील मंडळींच्या कानात रुणूझुणू लागली. प्रचिती देणाऱ्याची ताकद अफाट आहे.. घेण्यासाठी ती पेलण्याची ताकद हवी... असो.. श्री. श्रीकृष्ण रानडे न्यासाचे अध्यक्ष तर श्री. गोपाळ का. (गो. का.) रानडे सचिव पदावर नियुक्त झाले, पहिल्या कार्यकारिणीचे गठन झाले व अल्प-स्वल्प सदस्य संख्येने श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार न्यासाचे कामकाज मोठया दिमाखात सुरु झाले. मितभाषी व मृदू स्वभावाच्या कै. गो. कां नी न्यासाचे काम अतिशय निष्ठेने केले व त्यास आकार देण्यास सुरुवात केली. भारतात बऱ्याच ठिकाणी स्व-खर्चाने हिंडून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर मध्य-प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजराथ इ. भागाचे दौरे करुन त्या भागात स्थायिक झालेल्या परिवारातील मंडळींना बोट धरुन एकत्र आणले.
महाशिवरात्री बरोबरच श्रावणात महारुद्र व कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमा; श्री. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात साजरी करण्याचा घाट घातला. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक कार्य देखिल हाती घेतले गेले. कै. श्री. ज. (बापूसाहेब) रानडे यांचे प्रयत्नाने ’आसव’ नदीवर लोखंडी साकव उभारण्यात आला जो आजतागायत सर्वजणांच्या वापरात आहे. आसूद गावात वीज आणण्याचे काम झाले. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्द्ध झाला. परिवाराचा विस्तार होऊ लागला व आता गरज होती ती न्यासाचे स्वत:चे भक्तनिवास बांधण्याचे. जागेचा प्रश्न श्री. राजाभाऊ बिवलकर यांचे मदतीमुळे मार्गी लागला. परिवारातील कुठल्याही पदावर नसलेला पण सर्वेसर्वा असल्याच्या थाटात वावरणाऱ्या एका नत:द्रष्टाने ही जमीन स्वत:च्या नावावर करुन घ्यायचा घाट घातला होता परंतू श्री. राजाभाऊंनी तो हाणून पाडला आणि न्यासाला स्वत:ची जमीन झाली.
श्री. व्याघ्रेश्वराची इच्छा !! सर्व मंडळी लगबगीने कामाला लागली, कै. आत्मारामपंत धारपांनी मुहुर्ताची कुदळ मारली व कै. श्री. नि. रानडे व समस्त व्याघ्रेश्वर भक्तांच्या अथक प्रयत्नातून श्री. व्याघ्रेश्वर भक्तनिवास उभे राहीले. आज या परिवाराच्या भक्तनिवासात येणाऱ्या भक्तांची निवास व भोजन व्यवस्था अल्प-स्वल्प देणगीत केली जाते. पाठोपाठ श्री. व्याघ्रेश्वर मदिरासमोर सभामंडपाची शेडचे काम करुन घेण्यात आले. कै. गो. कां नी; न्यासाच्या स्थापने पासून ते १९९४ डिसेंबर पर्यंत न्यासाचे काम उत्तम पद्धतीने सांभाळले. अनेक कार्यकर्त्यांची फौज त्यांनी उभी केली. त्यांचे पुत्र कै. सतिश व श्री. सुरेश यांना उत्सवकालात मांडवाचे काम विना-मोबदला करण्यास प्रोत्साहित केले व त्यांच्या आशिर्वादाने आजही त्यांचे पुत्र श्री. सुरेश व स्नुषा श्रीमती प्राची सतिश रानडे "श्रीं" चे उत्सवकाळात जातीने उपस्थित राहून मांडव व्यवस्था उत्तम सांभाळतात. कै. गो. कां नंतर प्रथम काळजीवाहू म्हणून श्री. अरुण वैशंपायन यांनी व कार्यकारिणी निवडणूकीनंतर श्री. ए. डी. रानडे यांनी न्यासाचे सचिव म्हणून पदभार स्विकारला. आपल्या अल्पशा कार्यकालातही त्यांनी भरीव कामगिरी केली. न्यासाच्या धार्मिक कामकाजाबरोबरच, साकवाच्या पायऱ्या बांधून घेणे, गावकऱ्यांसाठी वैद्यकिय शिबिर भरवणे इ. समाजोपयोगी कामे करुन त्यांनी न्यासाला नवी दिशा दिली.
१९९६ ते २००१-०२ या कालावधीत न्यासाची धुरा श्री. एस. जी. रानडे यांनी यशस्वीपणे वाहिली. त्यांची सामाजिक कार्यातील तडफ, त्यांनी आपल्या सचिव पदाच्या कारकिर्दीत प्रभावीपणे दाखवली. आसूद व पंचक्रोशीतील विप्र ग्रामस्थांना कार्यप्रवाहात ओढण्याचा त्यांनी प्रामाणिक व कसून प्रयत्न केला. कार्यकारिणी २००२ च्या निवडणूकीनंतर नवनियुक्त सचिव श्री. व्ही. बी. रानडे यांनी उत्कृष्ट सुरुवात केली परंतू त्याच दरम्यान शाळेतील नोकरीत त्यांचेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने न्यासाचे नवनियुक्त तरुण अध्यक्ष श्री. धनंजय श्री. रानडे यांचेवर प्रथमच न्यासाच्या कामकाजाची जबाबदारी आली. अर्थातच, परिवारातील दुसऱ्या पिढीकडे न्यासाचे नेतृत्व सोपवण्यात आले. दिवंगत पिता कै. श्री. ज (बापूसाहेब) रानडे यांचे कडून श्री. व्याघ्रेश्वरसेवेचा वसा घेतलेल्या श्री. धनंजय रानडे यांनी सर्व कार्यकारिणी व विश्वस्त मंडळाला विश्वासात घेवून संपूर्ण सहमतीनेच न्यासाचे कामकाज पुढे नेण्याचे धोरण स्विकारले. अडी-अडचणी अनंत होत्या. परंतू श्री. व्याघ्रेश्वराच्या आशिर्वादाचे बळ पाठीशी घेऊन न्यासाचे सर्व कार्यकर्ते व सदस्य एकदिलाने उभे राहील्याने कार्य सुलभ होत गेले.
परिवारातील उपरोल्लेखीत नत:द्रष्टाच्या अहंकारी व कुटील कारवायांमूळे काही गांवकरी त्याच्या नादी लागून मंदिर परिसरातील धर्मशाळा उध्वस्त करण्यात आली व न्यासाच्या अध्यक्षांना न्यायालयात धाव घेणे भाग पडले. जो वेळ (इ. स. २००६ ते २००८ अशी पूर्ण दोन वर्षे या साठी खर्च झाली) व जो पैसा (न्यासाला तोशीस न लागू देता, परिवारातील कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने न्यायालयीन लढ्यास लागणारा खर्च भागवला) सुधारणा करण्यात लावता आला असता तो केवळ एका स्व-अधिकार गाजवण्याची ईर्षा बाळगणाऱ्या नादानामूळे अनाठायी खर्च झाला. अंतत: या नादानाचा कुटील डाव गावकऱ्यांच्या लक्षात आला व न्यास व गावकऱ्यात तडजोड होऊन सगळे मिळून एकदिलाने "श्रीं" च्या कार्यास लागले... असो... धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देण्याचा वसा या कार्यकारिणीने देखील कायम ठेवला. इ.स. २००४ मधे सर्व सामान्य ग्रामस्थांसाठी नळ-कोंडाळ योजना, बस थांबा, वैद्यकीय शिबिरे, दंत वैद्यकीय शिबिर असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. गेली चार-पाच वर्षे, आपल्या परिवारातर्फे आसूद व मुरुड येथील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाठयपुस्तके, वह्या इ. शालेपोयोगी साहित्य, मा. एअर कोमोडर (निवृत्त) श्रीपाद अच्च्युत रानडे यांचे एक-हाती देणगीतून देण्यात आले. त्यांचेच सहृदय देणगीतून, आसूद व पंचक्रोशीतील निरक्षर प्रौढांसाठी, परिवाराने ग्राम साक्षरता अभियान दोन वर्षे यशस्वीरीत्या चालवला. त्यासाठी आसूद येथील चार मुलींना पुण्यातील टाटा कंसलटन्सी तर्फे पुण्यात प्रशिक्षणही देण्यात आले होते. ग्रामस्थ व आसूद भक्तनिवासात मुक्कामाला येणाऱ्या भक्तांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने, राष्ट्रीय किर्तनकार कै. पुष्पलताबाई रानडे यांचे देणगीतून वाचनालय चालवण्यात येते.
श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराने, कोकणातील सर्वजनांसाठी; श्री रामदेवबाबा प्रणित पतंजली योगविद्या शिबिराचे आयोजन दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर केले. या योगज्ञान शिबिराचा लाभ परिवार सदस्यांसह, दापोली व पंचक्रोशीतील हजारो सर्वधर्मीय बांधवांनी घेतला. श्री. रामदेवबाबांच्या या जागतिक ख्यातनाम संस्थेचे कोकणातील पहिले योगशिबिर घेण्याचा मान श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार या आपल्या न्यासाला मिळाला. परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांचा यात सक्रिय सहभाग राहीला. या कार्यकारिणीने, भक्तनिवासाचा पहिला मजला बांधणे, तसेच उत्सव मंडप, नवी शौचालये व स्नानगृह बांधणे, मैदानाचे सपाटीकरण, सीमाभिंती इ. कामे पूर्ण करुन कामाला गती दिली. २००९ पासून दरवर्षी पावसाळ्यात किमान १५ झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला व त्यातही आपण प्रगती पथावर आहोत. या वनीकरणासाठी सध्या कमतरता आहे ती पाण्याची. न्यासाच्या आवारात आम्ही, सर्वश्री श्री. दिपक वैशंपायन, अंबादास काष्ठौषधीचे संचालक श्री. नितिन रानडे व अॅड. अशुतोष रानडे यांचे अनुदानातून, सुमारे चार कुपनलिका घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्यास फारसे यश आले नाही. त्यामुळे, डिसेंबर २०११ मध्ये मोठी विहीर खणून पाण्याचा प्रश्न सोडवायचे ठरवले आहे. "श्री" कृपेने पाणी लागले तर उत्तमच अन्यथा "रेन वॉटर हार्वेस्टींग" द्वारे वर्षभर पुरेलसे पाण्याचा साठा करता येऊ शकेल असे आम्हाला वाटते.
Central Bank of India, Deccan Gymkhana branch, Pune.
SB A/C No. 1014330094, IFSC : CBIN0280655
State Bank of India, Dapoli Branch, Dist. Ratnagiri.
SB A/C No. 11325447697, IFSC : SBIN0001047