श्री क्षेत्र व्याघ्रेश्वर :
गाथा कुलस्वामीची हिंदू वेद व पुराणात, नित्य पूजा-कर्मात "कुलस्वामी" उपासनेला एक अनन्यसाधारण महत्व दिले आहे. कुलस्वामी या शब्दातच त्याच्या व्युत्पत्तीचा बोध होतो... कुळाचा स्वामी अर्थात मूळ आराध्य दैवत तो "कुलस्वामी". "कुळाचा स्वामी" निश्चितीला देखील काही आधार दिसतो.. हिंदू धर्मातील जवळपास प्रत्येक ज्ञातीने "कुलदैवत" ही संकल्पना स्वीकारली / अंगिकारलेली दिसते. काही ज्ञातीत कुलदैवत म्हणून फक्त देव (भगवान विष्णू, शंकर, खंडोबा, विठ्ठल, काळभैरव इ.) तर काही ज्ञातीत फक्त देवी (अंबाबाई, भवानी, मरीआई, यलम्मा, शांतादुर्गा इ.) आहेत. महाराष्ट्रातील चित्पावन ज्ञातीत मात्र कुलदैवतात देवाबरोबरच देवीचाही समावेश आहे.
चित्पावन ज्ञाती ही मूळ महाराष्ट्रातील किंवा ते स्थलांतरीत झालेले आहेत या विषयी बरीच मत-मतांतरे आहेत. सातवाहन कालीन एका उपलब्ध शिलालेखानूसार त्या काळात चित्पावन ब्राह्मण यज्ञकर्मा साठी उत्तरेतून गुहागर जवळ आल्याचा उल्लेख सापडतो.. तर पारंपारीक कथेनुसार श्री. परशुरामाने, बाणाने समुद्राचे पाणी हटवून तयार केलेल्या "अपरान्त भूमी" त म्हणजेच कोकणभूमीत खास यज्ञकर्मासाठी १३ प्रेतांना संजीवन करुन त्यांचे "चित्त पावन" करुन घेतले ते "चित्पावन" असे मानतात. एका संशोधकाने चित्पावन मंडळींच्या कवटीचा आकार व रचनेवरुन ते मध्य-पुर्वेतून जहाजामधून स्थलांतरीत झाले असावे असे अनुमान काढले आहे. एक मात्र नक्की की एतद्देशीय लोकांपेक्षा रुप-रंग, बांधा, डोळ्यांचा घारा रंग, कुशाग्र बुद्धी यामूळे त्यांचे वेगळेपण उठून दिसते. चित्पावन ज्ञाती ही मूलत: शैव असून (काही चित्पावन कुलांचा कुलदैवत लक्ष्मी-केशव, केशवराज इ.) आहे. बऱ्याच कुटुंबांची कुलदेवता मात्र बीड जिल्ह्यातील अंब्याची योगेश्वरी आहे... असो. अशा चित्पावन ज्ञातीतील रानडे, मनोहर, फफे, कंद्रप, आखवे (भारद्वाज गोत्र), वैशंपायन, सहस्त्रबुद्धे (नित्युंदन गोत्र), धारप, विद्वांस, मराठे (कपि गोत्र), केतकर (गार्ग्य गोत्र) व फक्त काश्यप गोत्री जोशी उपनावांचा कुलस्वामी, श्री क्षेत्र आसूद येथील "श्री. देव व्याघ्रेश्वर" आहे.
श्री. क्षेत्र आसूद हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात असून दापोली पासून ८ कि.मी. अंतरावर हर्णे रस्त्यावर मुरूडच्या अलीकडे आहे.
समुद्र किनाऱ्यापासून फक्त २.५ कि.मी. वर असलेल्या श्री. व्याघ्रेश्वर मंदिराचा परिसर अतिशय नयनरम्य असून त्यास भेट देणारा त्याचे लोभस रुप पाहून प्रेमात न पडेल तरच नवल !! दापोली सोडले की हर्णैच्या दिशेने जाताना असलेली दुतर्फा झाडी, वनराईचा थंडावा प्रवासाचा सर्व थकवा दूर करते. ताज्या दमाने, समुद्र राजरस्त्याच्या बाजूस असलेले "श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी" परिवाराचे जुने व नवे "शिवालय भक्त-निवास" आपले स्वागत करण्यास सदैव तत्पर !! ... "भक्त-निवासा" जवळील जांभा दगडात बांधलेल्या लांबसडक पायऱ्या उतरुन खाली गेले की नदी पात्र ओलांडण्यासाठी एक "लोखंडी साकव" (कोकणात नदी-पात्र ओलांडण्यास बांधलेल्या अरुंद पुलास "साकव" असे म्हणतात) लागतो. पूर्वी येथे फक्त पावसाळ्याच्या दिवसात पोफळीने तयार केलेला तात्पुरता "साकव" असायचा तर इतर ऋतूत नदी पात्रातूनच ओलांडावी लागे. श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातील अर्ध्वयू व स्थापत्य अभियंता कै. श्री. ज. तथा बापूसाहेब रानडे यांचे प्रयत्नातून या लोखंडी साकवाची सोय दर्शनेच्छुक तसेच ग्रामस्थांना झाली व मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुकर झाला. आता त्याच जागी आम्ही (श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार व श्री व्याघ्रेश्वर देवस्थान न्यास) कायम व लवकरच ते प्रत्यक्षात उतरवतील... असो.. "साकव" ओलांडून जांभ्याच्या पायऱ्या उतरुन खाली गेले की लगेच डाव्या हातास श्री. व्याघ्रेश्वर मंदिराच्या प्रवेशाची, दगडात बांधलेली कमान दिसते. कमानीतून आत शिरलो की दोनही बाजूस सुमारे १२ फूट ऊंचीच्या दगडी दीपमाळा आहेत व समोर दृष्टीस पडते ते पूर्वाभिमूख असलेले प्राचीन श्री. व्याघ्रेश्वराचे मंदिर. प्रवेशाजवळील दगडी दीपमाळ ही प्राचीन मंदिर रचनेतील एक वैशिष्ट्य आहे. सांज-समयीला मंदिर प्रांगणात तेल / तुपाचे दिवे ठेवण्यास मुख्य दगडातून कोरुन बाह्यभागात काढलेल्या (कँटिलीव्हर) सुमारे २१ ते ५० दिवड्यांची नागमोडी रचना केवळ बघतच रहावी अशी. प्रत्येक देवडीवर एक दिवा व सर्वात वर पसरट भागावर "त्रिपूरदीप" ठेवण्याची परंपरा उत्सवकालात आजही पाळली जाते. तम (अंधार) दूर करणारा दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे. मंदिर प्रांगणात प्रवेशीत झाल्यावर अज्ञानरुपी "तम" दूर करणारे हे ज्ञानदीप आपल्या चित्तात शाश्वत ज्ञान पेटवण्याची जणू ग्वाहीच देतात !! अर्थात पायरी-पायरीने वर चढत जाणारे ... दीपमाळेच्या रचने सारखेच .. परेतून चढत जाणारे व सहस्त्रारापर्यंत पोहोचणारे !! प्रवेशातच "शाश्वत" ज्ञान मिळण्याची हमी फक्त आपल्या हिंदू मंदिरातच मिळते .. ज्ञान देणारा "आत" गाभाऱ्यात बसलाय पण ग्रहण करणाऱ्यालाही ते ताकदीने करावे लागते हे नक्की. "त्या"ला पूर्णपणे शरण गेल्यास (सरेंडर) ही ताकद नक्कीच प्राप्त होते. हिंदू परंपरेप्रमाणे कुठल्याही मंदिरात किंवा वास्तूत प्रवेश करताना शरीरशुद्धीस खूपच महत्व आहे.
चित्तशुद्धीची पहिली पायरी ही शरीरशुद्धी आहे हे नि:संशय !! श्री. व्याघ्रेश्वर मंदिर प्रांगणात असलेली "पुष्करणी" विहिरीतून पाणी आणून, हात पाय धुवूनच मंदिर सभामंडपात प्रवेश करावा हे प्रत्येक भक्ताच्याही आता अंगवळणी पडले आहे. मुख्य मंदिराच्या शेजारीच असलेली व चौकोनी शाळुंकेच्या आकाराची ही "पुष्करणी", गावाची जीवनदायिनीच आहे.
ऊन्हाळ्यात जेव्हा इतरत्र पाणी आटून कमी होते तेंव्हा याच पुष्करणीचा आधार आजुबाजूच्या आसूद वाडी-वस्तीकरांना असतो. जांभ्यात बांधलेल्या पायऱ्या उतरुन खाली गेले की अतिशय मधूर चवीचे पाणी दॄष्टोत्पत्तीस पडते. पुर्वापार हे पाणी पवित्र समजले जाते. याच पुष्करणीतील जलाने, उत्सवकालात सहस्त्रधार पात्रातून तर इतर दिवशी अभिषेक पात्रातून "श्री. व्याघ्रेश्वरावर" संततधार धरली जाते. मंदिरपरिसरात श्री. गणेशाचे कौलारु रचनेचे व आई योगेश्वरीसह श्री. काळभैरवाचे छोटेखानी परंतू कळस असलेले अशी अजून दोन पुरातन मंदिरे आहेत... तसेच श्री. व्याघ्रेश्वर मंदिराशेजारी ग्रामदेवता श्री. झोलाईमातेचे टुमदार मंदिर आहे. मंदिर परिसराचे सभोवताली घडवलेल्या चिरा (स्थानिक दगड : जांभा) ज्यास पवळी असे संबोधले जाते, त्याची संरक्षक भिंत आहे. ही भिंत पुरातन असून काही ठिकाणी ढासळली आहे. श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार व श्री व्याघ्रेश्वर देवस्थान न्यासाने "मंदिर व परिसराच्या जिर्णोद्धाराचे" काम दानशूर भक्तांच्या मदतीने नुकतेच हाती घेतले असल्याने मंदिर व परिसरास पुन: गतवैभव प्राप्त होईल असे वाटते.. असो. मुख्य "गर्भगृहा" पुढील "सभामंडपात" पूर्वेकडून प्रवेश करायचा रिवाज आहे. पायऱ्या चढून सभामंडपात शिरले की प्रथम नंदीस भेटण्याची पद्धत. नंदी हे भगवान शंकराचे वाहन.. व मंदिरातील द्वारपाल देखील !! .. या मंदिरातील नंदी हा सालंकृत असून अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुमारे दोन-सव्वादोन फूट उंच असलेला व दगडात घडवलेला हा नंदी, श्री. क्षेत्र महाबळेश्वर मंदिरातील नंदीची हुबेहूब प्रतिकृती आहे.. फरक फक्त आकारमानाचाच... श्री. क्षेत्र महाबळेश्वर मंदिरातील नंदी आकारानी जवळजवळ अडीचपट आहे!. नंदीने मुखात ऋषीला पकडले आहे. संतप्त अगस्तीने सागर गिळला व सर्व पृथ्वीवर एकच हाहाकार माजला. भक्तांनी "सांबा"ला साकडे घातले व भगवान शंकराने नंदीला अगस्ती ऋषींना पकडून आणण्याचा आदेश दिला. अगस्ती ऋषी लपून बसले पण नंदीने त्यांना शोधून काढले व आपल्या मुखात पकडून सदाशिवासमोर आणले.. अशी पुराणात एक कथा आहे. तीच अख्यायिका या नंदीच्या मुर्तीत कोरलेली दिसते. ऋषी, नंदीचे सुडौल शरीर, त्यानी ल्यायलेले दागिने व आभूषणे.. त्याचे "प्रपोर्शन".. हे सर्व एकाच प्रचंड पाषाणात घडवलेले ... खरच नेत्रसुखदच म्हणावे असे !! १९८२ साला पर्यंत नंदीची घुमटी पुर्णपणे मोडकळीस आलेली व स्वतंत्र होती. श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराने नंतर, मंदिरापासून ते नंदीच्या पूढेपर्यंत सभामंडप उभारला. सभामंडपातून, आपण लाकडी कमान ओलांडली की अतिशय पुरातन अशा श्री. व्याघ्रेश्वर मंदिराच्या "अंतर्मंडपात" प्रवेश करतो. या पवित्र वास्तूची रचना एकमेवाद्वितीय (युनीक) अशी आहे.
या वास्तूचे जोते दगडी असून त्यावर अप्सरा, गंधर्व, देवतांच्या तसेच हत्ती इ. पवित्र प्राण्यांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. कोरीवकाम, मुर्तींच्या रचना, पद्धत पहाता इतिहासाचार्य कै. ग. ह. खरे यांचे अनुमानानूसार हे मंदिर सुमारे "एक हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे" असावे. "अंतर्मंडपाचे " जोते व मुख्य "गर्भगृह" हजार-बाराशे वर्ष पुरातन असले तरी अंतर्मंडपाचे छत मात्र शिवकालीन असावे. शिवपूर्वकालात; जंजीऱ्यापासून दक्षिणेपर्यंतचा मुलुख हबशी (अॅनबिसीनियन) मुसलमानांच्या अंमलाखाली असल्याने, तत्कालीन हिंदू एतद्देशीयांनी, मुसलमानी आक्रमणांपासून मंदिर इ. वास्तूंच्या संरक्षणासाठी मंदिरे वरुन कौलारु करण्याची पद्धत स्वीकारली. तद्वत या मंदिराचे "अंतर्मंडपावर" कौलारु छत आढळते. या छताचे वजन पेलण्यास बनवलेले "लाकडी ट्रसेस्" (तुळया) हे अतिशय कौशल्यपूर्ण व कल्पकतेने तयार केलेल्या दिसतात. लाकडात असूनही यास कुठेही खिळा, पाचर किंवा नट-बोल्टचा वापर केलेला दिसत नाही तर "एकमेकात कौशल्यपूर्ण गुंफलेली" अशी त्यांची रचना पहाणाऱ्यास त्यातच "गुंतवून" टाकते. इतकी सुंदर रचना इतरत्र कुठेही पहावयास मिळेल असे वाटत नाही. "अंतर्मंडपातील" लाकडी खांब कोरीव असून त्याचा तळ मात्र दगडी आहे. एकूणच "अंतर्मंडप" नेत्रसुखद व अप्रतिम वास्तूकलेचा नमूना आहे. अंतर्मंडपातूनच मुख्य "गर्भगृहाला" व अर्थातच "देवाला" प्रदक्षिणा घातली जाते. श्री. व्याघ्रेश्वराचे दर्शन घेवून प्रथम आपल्या डावीकडून तीन चथुर्तांश गर्भगृहाचे भोवती व नंतर परत फिरुन गर्भगृहासमोर येवून, आपल्या उजवीकडून एक चतुर्थांश व परत मुख्य गर्भगृहासमोर अशी एक प्रदक्षिणा पूर्ण होते. कुठल्याही शिवमंदिरात याच पद्धतीने प्रदक्षिणा घातली जाते. शिवलिंगाभोवती असलेल्या शाळूंकेतून निघणारी तीर्थाची नाली ओलांडायची नाही असे शास्त्र सांगते.. त्यामुळे ही प्रथा. जगातील कुठल्याही अणुकेंद्र / अणुभट्टीची (अॅटोमिक सेंटर / रिअॅक्टर) संरचना पाहिली असता आपल्या लक्षात येईल की, ही रचना जमीन पातळीच्या खाली असलेले शिवलिंग व त्याभोवताली असणारी शाळूंके प्रमाणेच असते. शंकर हा तांडव करणारा, उत्पत्ती-स्थिती-लय मधील लय करणारा... एरवी शांत व भोळा (अणू सुप्तावस्थेत असतो तसा) परंतू कृद्ध झाल्यावर महाभयंकर प्रलय घडवणारा !! ... हा सर्व योगायोग म्हणायचा किंवा कसे हा संशोधनाचा विषय आहे... असो ... कुठल्याही देवाकडे काय "याचना" करायची यास देखील एक शास्त्र आहे. ब्रह्मदेवाकडे नवनिर्मितीची, आत्मिक जागृतीची, विष्णूदेवाकडे चित्त स्थिर करण्याची, आत्मिक स्थिती आणण्याची तर महादेव हा लयाचा अधिकारी आहे, त्याचे कडे शत्रूचा नव्हे तर त्याच्या कडे असलेल्या दुर्गूणांचा, मन सैरभैर करणाऱ्या पापी प्रवृत्तीचा (षड्रिपूंचा), आपल्यावर येणाऱ्या संकटांच्या नाशाची "याचना" करावी... असो.. अंतर्मंडपातून कमी ऊंचीच्या दगडी बांधीव कमानीतून नत:मस्तक होवून पाच पायऱ्या उतरुन खाली थेट "श्री. व्याघ्रेश्वराच्या" दरबारात प्रवेश करता येतो. नत:मस्तक अर्थात अंहकार दूर करुन, पंचमहाभूतापासून बनलेल्या शरीरातून (पाच पायऱ्या) आत खोल उतरुन हृदयात वसणाऱ्या "त्या" शाश्वताला जाणून घेणे ह्या एकमेव उद्दिष्टानेच "हे भक्ता तू आत प्रवेश कर" असे तर ही संरचना सुचवत नसेल ना !!.. नव्हे नव्हे हेच तर मनुष्यजन्माचे खरे कर्म आहे !! "श्री व्याघ्रेश्वर" मंदिराचे "गर्भगृह" सुमारे ७’ बाय ७’ असे चौकोनी आकाराचे आहे. गर्भगृहात फक्त पुरुषांनी व तेही ओलेत्याने किंवा सोवळे नेसूनच प्रवेश करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. गर्भगृहाची रचना हिंदू "हेमाडपंथी शैली" नूसार बांधलेली दिसते.
गर्भगृहावरील पायऱ्या-पायऱ्याने चढत जाणारा छोटेखानी कळस त्याची "हेमाडपंथी शैली" प्रकट करते. हा कळस अंतर्मंडपाच्या कौलारु छताच्या आतमधे आहे. श्री व्याघ्रेश्वराची "स्वयंभू पिंड" काळ्या पाषाणाची असून त्याचे भोवताली पाषाणातीलच "शाळूंका" आहे. शाळूंका ’तीर्थ नालीला’ आतून जोडली असून अंतर्मंडपाचे बाहेरचे बाजूस जोत्याबरोबरच असलेले दगडी घडीव "गोमुखा"स जोडलेली आहे. आत गर्भगृहात संपन्न होणाऱ्या अभिषेकाचे तीर्थ याच "गोमुखा"तून बाहेर पडते. ते जमा करण्यास बाहेर गोमुखाखालीच एक चौकोनी व सुमारे एक पुरुष खोल तीर्थकुंड आहे. गोमुख सुबक असून एकूणच जोत्यावरील इतर मुर्तींबरोबर सुमारे १००० ते १२०० वर्षांपूर्वी घडवलेले दिसते. येथे येणारा विन्मुख होवून कधीच गेला नाही व जाणारही नाही. पराकोटीचा "आत्मिक ज्ञानानुभव" घेण्यासाठी मात्र आपणास "त्यास" पूर्ण शरण जावे लागते.. सर्व "त्याच्या" वर सोपवावे व आपण निजानंदात मग्न व्हावे हेच खरे. पूर्वीच्या काळी वीज नसल्याने गर्भगृहात अखंड नंदादीप तेवत ठेवण्याची प्रथा व इतरही धार्मिक परंपरा, श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार व स्थानिक भक्तांनी आजही जतन करुन ठेवली आहे. श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातर्फे श्री व्याघ्रेश्वर मंदिरात श्रावणात शेवटच्या सोमवारी "महारुद्रोत्सव", कार्तिक पौर्णिमेस "त्रिपुरोत्सव" व माघात "महाशिवरात्र उत्सव" अतिशय उत्साहात साजरा केला जातो. त्यास श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवारातील भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. परिवारातर्फे, आसूद व पंचक्रोशीतील गावांतील सर्वसामान्यांसाठी योग शिबिर, वैद्यकीय शिबिर, नेत्रोपचार शिबिर, रक्तदान अशा सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले जाते. परिवारातील अर्ध्वयू एअर कोमोडोर (निवृत्त) श्रीपाद अ. रानडे यांचे उपक्रमातून, ग्रामसाक्षरता अभियान, वाचनालय, स्थानिक शाळेतील मुलांसाठी शिक्षणोपयोगी साहित्याचे वाटप इ. उपक्रम राबवले जातात. "व्रत सेवेचे - भक्तीचे - ज्ञानाचे" या परिवाराच्या बोधवाक्यानूसार त्यांची वाटचाल अविरत चालू आहे. अर्थात करुन घेणारा "तो" पाठीशी आहेच. अशा श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराचा सर्वे-सर्वा असणारा व "नवसाला पावणारा" अशी ख्याती असलेला आमचा प्रिय कुलदैवत व त्याची गाथा शब्दांकित करण्याचा हा प्रयत्न.
लेखनसीमा !! श्री. धनंजय श्रीकृष्ण रानडे, दूरध्वनी : ९८२२२९५६१० / ९४२३१३८३६५
Central Bank of India, Deccan Gymkhana branch, Pune.
SB A/C No. 1014330094, IFSC : CBIN0280655
State Bank of India, Dapoli Branch, Dist. Ratnagiri.
SB A/C No. 11325447697, IFSC : SBIN0001047