जय व्याघ्रेश्वर !!!
२७ वर्षांपूर्वी १९९० मध्ये लग्न झाल्यावर प्रथमच श्री देव व्याघ्रेश्वराचें दर्शन झाले आणि मी श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराची सदस्य झाले. १९९१-९२ दोन वर्षे आम्ही उत्साहाने पुण्याहून महाशिवरात्रीसाठी एस. टी. बसचे आयोजन केले. १९९३ नंतर २००३ पर्यंत व्याघ्रेश्वराशी संपर्क काहीसा तुटल्यासारखा झाला. आसूदला जाणं फार कमी वेळा झालं. २००९ नंतर श्री. धनंजय रानडे यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. मधल्या काळातल्या अनेक घडामोडी त्यांच्या तोंडून ऐकताना थक्क झालो. २०११ मध्ये प्रथमच परिवाराच्या निवडणुकीला हजर राहिलो. श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार शिक्षणनिधी समिती स्थापन झाली. त्यात माझा सचिव म्हणून अंतर्भाव झाला. परंतु दुर्दैवाने या समितीचे कोणतेच उल्लेखनीय कार्य झाले नाही.
२०१४ च्या पुढच्या निवडणुकीत मी व्याघ्रेश्वर परिवाराच्या कार्यकारिणीची सदस्य झाले. दरम्यान २०११ पासून पुन्हा आसूदला जाणे सुरु झाले. व्याघ्रेश्वराच्या कामातला सक्रिय सहभाग वाढू लागला. कार्यकारिणीत प्रवेश झाल्यावर तर पुण्यामध्ये जवळ जवळ प्रत्येक रविवारी चित्पावन संघातील मीटिंगला मी व माझे यजमान हजार राहू लागलो. श्री. धनंजय रानडे यांच्या मनातील व्याघ्रेश्वर मंदिर जीर्णोद्धार व इतर अनेक उपक्रमांना मूर्त स्वरूप देणे किती गरजेचे आहे हे लक्षात आले. त्यासाठी जीवतोड प्रयत्न सुरु झाले. वार्षिक तीनही उत्सवांना अधिकाधिक सुनियोजित करण्यासाठी अध्यक्ष श्री. धनंजय रानडे व इतर कार्यकारिणी सदस्यांच्या मदतीने खूप नव्या कल्पना राबवू लागलो.
लोकांचा सहभाग वाढवू लागलो. नव्या जबाबदाऱ्या घेऊ लागलो आणि नव्या कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपवूही लागलो. २०१७ जून मध्ये अचानक ध्यानी मनी नसताना श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराच्या अध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली. प्रथमच परिवाराची अध्यक्ष एक महिला झाली. व्याघ्रेश्वराच्या कृपेची बरसात झाली. पण त्याच वेळी जबाबदारीच्या ओझ्याने जीव दडपून गेला. सर्वांच्या सहकार्याने २०१७ चा श्रावणी महारुद्र व २०१८ चा महाशिवरात्र उत्सव तर उत्तम पार पडले. आता डोळ्यांसमोर अनेक नवीन आव्हाने आहेत. त्याकरिता आपल्या सर्वांचा आर्थिक सहभाग प्रार्थनीय आहे.
• मंदिराचा आहे तो ढाचा कायम ठेवून वरून स्लॅब टाकणे
• मंदिराच्या अंतर्भागातील लाकडी तक्तपोशीला संरक्षण देणे
• योगेश्वरी कलामंचाच्या (स्टेज) कडेला चार खोल्या बांधणे
• भोजन कक्ष ते दीपमाळ - कायमस्वरूपी मंडप घालणे
• मंदिर परिसर स्वच्छ करुन कडेने बसण्यासाठी कट्टे घालणे
• स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करणे व त्यांची संख्या वाढवणे
• मंदिर परिसरात फरशी बसवणे
• वेबसाईट अद्ययावत करून सतत अपडेटेड ठेवणे
• रेनवॉटर हार्वेस्टिंग करून पाण्याचा प्रश्न सोडवणे
• श्री व्याघ्रेश्वराची स्मरणिका तयार करणे
• भक्तनिवास ते मंदिर - RCC साकवाचे काम करून घेणे
चला तर मग.... व्याघ्रेश्वर पाठीशी आहेच. तोच या कार्याची प्रेरणा देतो आहे. कार्य पूर्णत्वालाही तोच नेईल. फक्त हे शिवधनुष्य पेलण्याची शक्ती त्याने द्यावी ही प्रार्थना.