श्री व्याघ्रेश्वराचे मंदिर नदीकाठी वसलेले असून सुमारे १००० वर्षे जुने आहे. मंदिराचे अप्रतिम हेमाडपंथी स्थापत्य आपल्याला चकित करते. मंदिराच्या सभामंडपातून आपण गाभाऱ्याकडे जातो जिथे स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. गाभाऱ्याची कमान लाकडी कोरीव खांबांनी तोललेली आहे. श्री. शंकराचे वाहन, नंदी भव्य शिल्परुपात समोर उभा आहे. या मंदिराच्या जमिनीवर नृत्यागनांची शिल्पे आहेत. कालभैरवाचे लहानसे मंदिर ही येथे आहे. श्री. व्याघ्रेश्वर, हे अनेक चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांचे, प्रामुख्याने रानड्यांचे आराध्य कुलदैवत आहे.
संपूर्ण मंदिराचा परिसर दगडी भिंतीने आणि डोंगरांनी वेढलेला आहे ज्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून मंदिराचे संरक्षण होते. या दगडी तटबंदीच्या बाहेरच ग्रामदेवता श्री झोलाई देवीचे मंदिर आहे. हे व्याघ्रेश्वराचे सुंदर मंदिर त्याच्या ' गारंबीचा बापू ' ह्या कादंबरीतल्या आणि सिनेमातल्या उल्लेखामुळेही प्रसिद्ध आहे.
आसूदला जाण्याचे मार्ग -
आसूद गाव दापोलीपासून ८ कि. मी. अंतरावर आहे. दापोली आणि आसूद दरम्यान एस. टी. बसेस धावतात. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे दापोलीपासून रिक्षाने येणे किंवा खासगी वाहनाने येणे. येथे येण्यासाठी भाड्याच्या जीप किंवा कार ही उपलब्ध आहेत.